कल्याण: वडीलांना दारूचे व्यसन आणि आई मानिसक रूग्ण यातून आलेल्या नैराश्यातून वडील आणि आईची हत्या केल्याची कबुली लोकेश बनोरीया याने पोलिसांकडे दिली. जखमी अवस्थेत असलेल्या आणि उपचाराअंती बरा झालेल्या लोकेशला महात्मा फुले चौक पोलिसांनी मंगळवारी रूग्णालयातून ताब्यात घेतले.
12 डिसेंबरला पश्चिमेकडील चिकणघर परिसरातील निखिला हाईटस या हाय प्रोफाइल सोसायटीतील चौथ्या मजल्यावर राहणारे सेवानिवृत्त रेल्वे मोटरमन प्रमोद बनोरिया यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात आढळून आला होता तर त्यांची पत्नी कुसूम आणि मुलगा लोकेश जखमी अवस्थेत होते. कौटुंबिक वादातून वडीलांनी आमच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वत:वर चाकूने वार करून आपले जीवन संपविले अशी माहीती जखमी अवस्थेतील लोकेशने पोलिसांना सुरूवातीला दिली होती. मात्र पोलिस तपासात लोकेशनेच वडीलांची हत्या केल्याचे समोर आले. दरम्यान जखमी लोकेशसह आई कुसुमवर शीव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु कुसुम यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोकेशने स्वत:च्या गळयाच्या ठिकाणी वार करून घेतले होते. उपचाराअंती बरा झाल्याने पोलिसांनी त्याला मंगळवारी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता वडीलांना दारूचे व्यसन होते. ते दिवस रात्र दारु पित होते आई मानसिक रुग्ण होती. यातून त्याला नैराश्य आले होते. या नैराशातून त्याने दोघांची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहीती पोलिसांनी दिली.