कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांचा मुलगा चिदानंद यांच्या कारने धडक डोळ्याने एका ५६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बागलकोट जिल्ह्यातील चिक्कहंडागल गावातले कोडलेप्पा बोली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.या अपघातानंतर त्या शेतकऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चिदानंदचा चालक हनुमंतसिंग राजपूत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिदानंद सावदी यांच्या कारचा अपघात सोमवारी सायंकाळी उशिरा हुंगुंड शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग ५० वर कुडालसंगम क्रॉसजवळ झाला.
त्यावेळी शेतकरी आपल्या दुचाकीवरून शेतातून घरी परतत होता. ही गाडी मंत्री लक्ष्मण सावदी यांचा मुलगा चिदानंद यांची असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु चिदानंद कार चालवत असल्याचा पुरावा मिळालेला नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मोटारसायकलवरून शेतकरी प्रवास करत होता, त्यास एका भरधाव वेगाने येणाऱ्या एमजी ग्लॉस्टर कारने धडक दिली असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. हुंगुंड पोलिस ठाण्यातील एका अधिका-याने सांगितले की, गाडी अंजनाद्री हिल्स येथून विजयपुरामार्गे बेळगावातील अथणीकडे परत जात असल्याचे सांगण्यात आले.