मंगेश कराळे
नालासोपारा - शहरातील तुळींज, आचोळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी गोळा करणे, सरकारी कामात अडथळा, दहशत निर्माण करणे, पैश्यासाठी अपहरण करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, अवैध शस्त्रांचा वापर करुन धमकावणे, गर्दी मारामारी करणाऱ्या एका टोळीच्या सात सदस्यांना शुक्रवारी संध्याकाळी उशिरा परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी पाच जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. एकाच दिवशी सात जणांना तडीपार केल्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे.
आगामी गणेशोत्सव सणानिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी तडीपारीची कारवाई करून गुन्हेगारांबद्दल सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील परिसरात हे सात आरोपी कधी एकत्र टोळी करून गुन्हे करायचे तर कधी एकटे एकटे. या टोळीतील युवकांविरुध्द तुळींजचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्तांकडे सादर केला होता. याची चौकशी व सुनावणी होऊन या गुंडांच्या टोळीस पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये टोळीचा प्रमुख शुभम उर्फ बाबा मिश्रा, टोळी सदस्य संजय उर्फ मुन्नी सिंग, सत्यम उर्फ आदर्श रॉय, देव सिंग उर्फ भीम, अभिषेक शर्मा, सूरज सिंग उर्फ कबाडे आणि लवकुश पांडे यांचा समावेश आहे.’या टोळीतील युवकांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव सुरूच होता. जनतेमधुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे तुळींज आणि आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणुन त्यांच्यावर ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे सर्व स्थरातुन समाधान व्यक्त होत आहे.
कोट
एका टोळीच्या सात सदस्यांना पोलीस उपायुक्तांनी शुक्रवारी रात्री तडीपार करण्यात आले आहे. या सातही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. - राजेंद्र कांबळे (पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)