राशीन (जि. अहमदनगर) : कर्जत तालुक्यातील राशीन येथील एका धार्मिकस्थळाची विटंबना करण्याचा प्रकार बुधवारी (दि. १९) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडला. याप्रकरणी एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
बुधवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक ३३ वर्षीय युवक राशीन येथील एका धार्मिक स्थळामध्ये गेला होता. तेथे त्याने विटंबना केली. हे कृत्य केल्यानंतर त्याला तेथे उपस्थित भाविक व पुजाऱ्यांनी पकडले. त्यानंतर हा प्रकार गावात समजल्यानंतर ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने जमा झाले. हा प्रकार तोपर्यंत पोलिसांनाही कळविण्यात आला. पोलीसही तेथे आले. तोपर्यंत ग्रामस्थ घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महात्मा फुले चौकात एकत्र आले व रास्ता रोको केला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तेथे आले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांनीही संबंधित प्रकरणी कठोर कारवाई व्हावी यासाठी यादव यांना निवेदन दिले. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.