मडगाव: मडगावातील सराफ स्वप्नील वाळके याचा खून करण्यासाठी ज्या देशी कट्ट्याचा वापर करण्यात आला होता तो कट्टा संशयितांनी बिहारमध्ये जाऊन 70 हजार रुपये देऊन विकत घेतला होता.
या प्रकरणी तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचने बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातून शनी कुमार(34), राहुल कुमार(19) व कुंदन कुमार(26) या तिघांना अटक करून सोमवारी त्यांना गोव्यात आणण्यात आले. सोमवारी त्यांना न्यायालयात पेश केले असता त्यांना 7 दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला.
क्राईम ब्रँचचे निरीक्षक फिलॉमेन कॉस्ता यांनी सोमवारी राजधानी एक्सप्रेसमधून मडगावला आणून त्यांचा ताबा तपास अधिकारी असलेले निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या ताब्यात दिले.
2 सप्टेंबर रोजी मडगावात दिवसाढवळ्या त्यांच्याच दुकानात गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणात अटक केलेल्या मुश्ताफा शेख आणि इव्हेंडेर रोड्रिक्स या दोघांनी लॉकडाऊनच्या काळात बिहारात जाऊन या संशयिताकडून देशी कट्टा विकत घेतला होता. त्यानंतर ट्रेनने ते गोव्याला आले होते. त्यामुळे त्यांना मडगाव रेल्वे स्थानकावरून घेऊन जाण्यासाठी ओंकार पाटील गाडी घेऊन आला होता.
हा व्यवहार नेमका कसा झाला, मुश्ताफा आणि कंपनीचा या बिहारी संशयिताकडे कसा संपर्क आला त्याचा संपूर्ण तपास आता पोलीस करणार आहेत.