औरंगाबाद : अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणारे शेख लतीफ शेख सादेक (२०) आणि शेख आमीन शेख सांडू (१९) या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एस. शिंदे यांनी मंगळवारी दहा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे याप्रकरणात पीडिता फितूर झाली होती तरीही न्यायालयाने डीएनए चाचणीच्या आधारे आरोपींना शिक्षा सुनावली.
फुलंब्री तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेख लतीफ शेख सादिक , शेख अमीन शेख सांडू , शेख आसीफ शेख सांडू (२०), शेख करीम शेख हमीद (२३), शेख अमजद शेख इरफान (२०), शेख अफसर शेख यासीन (२२) आणि शेख अमीर शेख महमूद (१९, सर्व रा. धनशी वस्ती, फुलंब्री) यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. हा प्रकार सतत सहा महिने सुरु होता. मुलीने आईला अचानक पोट दुखत असल्याचे सांगितले. आईने तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ती गर्भवती असल्याचे सांगितले.
याप्रकरणी २२ जून २०१६ रोजी वडोद बाजार पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीतेने सातही जणांनी वेळोवेळी अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींना अटक केली. तसेच संपूर्ण तपास करत त्यांनी आरोपपत्र दाखल केले.
पीडिताच फितूरखटल्याच्या सुनावणी वेळी सहायक लोकअभियोक्ता उदय पांडे यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीदरम्यान फिर्यादी अल्पवयीन मुलगी फितूर झाली. याच दरम्यान तिने बाळाला जन्म दिला. पोलिसांनी बाळाची, पीडितेच्या मुलीची आणि आरोपींच्या गुणसूत्रांची (डीएनए) तपासणी केली. तपासणीत शेख अमीन शेख सांडूचे गुणसूत्र जुळले. पंच आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीवरून न्यायालयाने शेख अमीन आणि शेख लतीफ या दोघांना वरीलप्रमाणे शिक्षा आणि दंड ठोठावला. सरकारी वकील पांडे यांना पैरवी अधिकारी पठाण आणि पांढरे यांनी सहकार्य केले.