मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला आज वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र, तिसऱ्यांदा समन्स बजावून देखील कंगना अनुपस्थितीत राहिली आहे. या प्रकरणी आता कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाने दरवाजे ठोठावले आहे. कंगना राणौतविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिला दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत ती दोन्ही वेळा गैरहजर राहिली होती. त्यानंतर तिला तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला होता. तिसरा समन्स हा ‘फायनल अल्टीमेटम’ असून देखील कंगना हजर न राहिल्यास तिला अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, कंगनाने वांद्रे पोलीस ठाण्यातील गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता.
गेल्या महिन्यात कंगनाला मुंबईपोलिसांनी व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवली होती. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली होती. अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी १८ नोव्हेंबर रोजी तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहावे लागणार होते. २३ नोव्हेंबरला कंगनाला, तर २४ नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.१७ ऑक्टोबरला कंगनाविरोधात कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी तिला मुबंई पोलिसांनी नोटीस बजावली. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले होते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी कंगना राणौतने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाप्रकरणी वांद्रे कोर्टाने कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. मुंबई पोलिसांना हे आदेश दिले होते. त्यानुसार बॉलिवूड अभिनेत्री कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरूद्ध वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. हा एफआयआर भादंवि कलम २९५(अ), १५३(अ) आणि १२४(अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे न्यायालयाने कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते.