विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोहगाव, पुणे येथे राहणाऱ्या हेमंत अशोककुमार मित्तल या व्यक्तीने इयत्ता नववीमध्ये शिकणाºया एका १४ वर्षांच्या मुलीला फूस लावून २३ वर्षांपूर्वी तिच्या घरातून पळवून तिच्यावर बलात्कार केला होता, असा निष्कर्ष काढून उच्च न्यायालयाने त्यासाठी हेमंतला दोषीही ठरविले. मात्र हा गुन्हा केला तेव्हा हेमंत १६ वर्षे दोन महिने वयाचा बालगुन्हेगार होता हे लक्षात घेऊन बलात्कारासाठी शिक्षा न देता त्याची मुक्तता केली.
हेमंत आणि त्याच्यासोबत पळून गेलेली ही मुलगी चार दिवसांनंतर शिर्डीजवळ सापडले होते. लोहगाव येथील एअर फोर्स स्कूलमध्ये शिकणारी ही मुलगी खरे तर हेमंतच्या प्रेमात पडली होती व त्या प्रेमाच्या भरातच ती त्याच्यासोबत गेली होती. परंतु हेमंतला अटक करून पोलिसांनी या मुलीला पुन्हा आई-वडिलांकडे सुपूर्द केल्यावर तिने हेमंतविरुद्ध तक्रार केली. त्यातून उभ्या राहिलेल्या खटल्यात पुण्याच्या सत्र न्यायालयाने हेमंतला बलात्काराच्या गुन्ह्यात निदोष ठरविले. पण अपहरण व वाममार्गाला नेण्यासाठी अल्पवयीन मुलीला फूस लावणे या गुन्ह्यांसाठी त्याला प्रत्येकी एक वर्षाच्या कारावासाच्या शिक्षा ठोठावल्या होत्या.
याविरुद्ध सरकारने दोन व हेमंतने एक अपील केले. सरकारचे एक अपील हेमंतला बलात्कारासाठीही दोषी ठरवावे यासाठी तर दुसरे इतर गुन्ह्यांसाठीच्या शिक्षा वाढविण्यासाठी होते. हेमंतचे अपील पूर्णपणे निर्दोष ठरविण्यासाठी होते. गेली १८ वर्षे प्रलंबित असलेल्या या अपिलांवर मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निकाल दिला.खंडपीठाने म्हटले की, या मुलीने हेमंतशी स्वखुशीने शरीरसंबंध केला असला तरी कायद्याने तो बलात्कारच ठरतो कारण अल्पवयीन मुलीने यासाठी दिलेली संमती कायद्यास अमान्य आहे. त्यामुळे हेमंत बलात्कारबद्दल दोषी ठरतो. परंतु हा गुन्हा केला तेव्हा हेमंत स्वत: १६ वर्षांचा म्हणजेच बालगुन्हेगार होता. कायद्यानुसार अशा बाल गुन्हेगारांना दंड विधानाप्रमाणे शिक्षा न देता कमाल तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात पाठवावे लागते. पण आता हेमंत ३८ वर्षांचा झालेला असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यातहीकाही हाशिल नाही. त्यामुळे बलात्कार सिद्ध होऊनही आम्ही त्यासाठी त्याला कोणतीही शिक्षा देत नाही.
या अपिलांच्या सुनावणीत आरोपी हेमंतसाठी अॅड. अभिषेक अवचट यांनी तर सरकारसाठी अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर अरुणा पै यांनी काम पाहिले.इतर गुन्ह्यांतही निर्दोषखंडपीठाने हेमंतला भादंवि कलम ३६३ व ३६६ ए अन्वये इतर गुन्ह्यांतही निर्दोष ठरविले. एस. वरदराजन वि. मद्रास सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ५५ वर्षांपूर्वी दिलेल्या निकालाचा दाखला देत खंडपीठाने म्हटले की, एखादी अल्पवयीन मुलगी प्रेमाच्या भरात घरातून पळून जाते तेव्हा तिच्या प्रियकराने तिचे फूस लावून अपहरण केले, असे होत नाही.