लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गुप्तहेर तेजीत
By पूनम अपराज | Published: April 27, 2019 04:41 PM2019-04-27T16:41:15+5:302019-04-27T16:53:17+5:30
विरोधी पक्षांनी प्रचारासाठी चांगलीच कंबर कसली आहे.
मुंबई - अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुकांचे पडघम सर्वत्र घुमू लागलेत. राजकीय पक्षाच्या प्रचाराला देखील रंगात चढली आहे. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे आणि इतर पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. भारतात सत्तारूढ पक्षांसाठी आणि विरोधक पक्षांसाठी २०१९ ची लोकसभा निवडणूक महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरणार आहे. गेल्या वेलची म्हणजेच २०१४ सालची लोकसभा निवडणूक जशी अटीतटीची ठरली होती तशी मात्र, यंदाची निवडणूक नसेल. असे असले तरीदेखील गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा गुप्तहेर तेजीत आहेत. तसंच विरोधी पक्षांनी प्रचारासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे बऱ्याच राजकीय नेत्यांमध्ये चलबिचल सुरु आहे. एकीकडे पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असली तरी दुसरीकडे गुप्तहेरांच्या एजन्सीकडे गुप्त माहिती काढण्यासाठी सरसावले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हे गुप्तहेरांचे कामकाज सुरु झाले असल्याची माहिती भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गेल्या निवडणुकीत दिल्लीतील निवडणुकीत आप सारख्या नव्या पक्षाने यशस्वी होवून बऱ्याच मरतब राजकारणांची झोप उडवलीय. तसाच राजकीय वातावरण देखील ढवळून निघालं होत. त्यातच मोदी सरकारच्या स्थिर राजकारणामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी राजकीय पक्षापुढे आव्हान असणारच आहे. आणि आपआपल्या भागात आपल्या राजकीय पक्षाचा टिकाव धरून ठेवण्यासाठी अनेक पक्षांची रस्सीखेच सुरु आहे. भ्रष्टाचार, अर्थव्यवस्था, दहशतवाद, सुरक्षितता, लोकसंख्या याबरोबरच राज्य, नेते, धार्मिक व जातीय समीकरण, बिगरराजकीय संघटना, प्रसिध्दीमाध्यम हे या निवडणुकीवर प्रभाव टाकणारे घटक आहेत. त्याचप्रमाणे सोशल नेट्वर्किंग साईट सुद्धा आपलं मोलाचं काम बजावतं आहे. त्यातच आपला विरोधी पक्षाच्या हालचालीवर आणि जनतेचा पक्षाविषयी काय कल आहे हे जाणून घेण्यासाठी राजकीय मंडळींनी आता डीटेक्टीव्ह एजन्सीचे दरवाजे ठोठावत आहेत. यासाठी डीटेक्टीव्ह एजन्सीकडे एका दिवसासाठी १० ते २० हजार रुपये ओतावे लागत आहेत. प्रत्येक कामानुसार गुप्तहेरांची फी ठरते. गेल्या सहा महिन्यांपासून गुप्तहेरांकडे राजकीय पक्षांचे काम आले असून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात गुप्तहेरांचे काम तेजीत सुरु असल्याची माहिती रजनी पंडित यांनी दिली.
आता मतदानानंतर मतदान पेट्यांच्या स्थलांतरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि पैसे देऊन मतदात्याला विकत घेतले जाते आहे का हे पाहण्यासाठी गुप्तहेर कामाला लावले जातात अशी पुढे त्यांनी माहिती दिली. मतदानाआधी ६ महिने अगोदर जनसामान्यात राजकीय पक्षाविषयी काय वाटत ? तसेच विरोधी पक्ष आपला अपप्रचार तर करत नाही ना? मतदारांचा एकूणच कौल काय असेल हे डीटेक्टीव्ह एजन्सी नानाविध प्रकारे कौशल्यपूर्ण माहिती गोळा करण्यास कार्यरत आहे. त्यामुळे या गुप्तहेर कोणत्या न कोणत्या वेषात आपली भूमिका बजावून राजकीय पक्षांना इत्यंभूत माहिती देण्यास सरसावली आहे. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा गुप्तहेरांचे काम वाढले आहे. या मौसमात गुप्तहेर लाखो रुपये कमवतात.