नवी मुंबई : घर देण्याच्या बहाण्याने ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी विकासक सचिन झेंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून, दोन वर्षांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे.अटक केलेला सचिन जगन्नाथ झेंडे हा अम्रित डेव्हलपर्स व निसर्ग कन्स्ट्रक्शनचा प्रोप्रायटर आहे. त्याचे कामोठे, कोप्रोली, कोंडले, चिंचवली आदी ठिकाणी गृहप्रकल्प सुरू असून त्या ठिकाणी ग्राहकांकडून घरांच्या बुकिंगसाठी पैसे घेतले होते. त्यापैकी बहुतांश प्रकल्प पनवेल परिसरात सुरू असल्याचे त्याने दाखवले होते. प्रत्यक्षात मात्र प्रकल्प न उभारता ग्राहकांच्या पैशांची परतफेड न करता त्याने शेकडो जणांची फसवणूक केली होती.गृहप्रकल्पांसह त्याने पनवेलच्या चिंचोली भागात निसर्ग व्हिला नावाचा अलिशान बंगलो प्रोजेक्ट होणार असल्याचेही सांगून इच्छुक ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये घेतले होते. अशा प्रकारे त्याने मागील काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. त्यानुसार या फसवणूक प्रकरणी त्याच्याविरोधात नवी मुंबईसह मुंबई व इतर परिसरात गुन्हे दाखल आहेत.तर ग्राहक मंचात १८२ प्रकरणे प्रलंबित असून, २२ प्रकरणात न्यायालयात हजर राहत नसल्याने न्यायालयाने वॉरंट काढलेले आहे. यानंतरही मागील दोन वर्षांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. अखेर त्याच्या अटकेसाठी पोलीस आयुक्त संजय कुमार, गुन्हे शाखा उपआयुक्त प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष २ चे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे, सहायक निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या पथकाने त्याला अटक केली आहे.मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १७ आॅगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार संबंधित ग्राहकांनी गुन्हे शाखा आर्थिक शाखेला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
फसवणूकप्रकरणी विकासकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 2:38 AM