गौरी टेंबकर - कलगुटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्तांनी घरासाठी सर्व्हिस फंड रिकामा करत बिल्डरला २५ लाख रुपये दिले. मात्र गेली दोन वर्षे हे पैसे वापरत त्याने या पोलीस अधिकाऱ्यांची फसवणूक केली. यामुळे हवालदिल झालेल्या निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्तांनी अखेर पोलीस आयुक्तांची भेट घेत बोरीवली पोलीस ठाण्यात सुदामा ग्रुप आॅफ बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचा मालक प्रवीण वृंदावनदास वोरा आणि त्याचा पार्टनर स्नेहलभाई मंडेलिया यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
प्रकाश रामगुडे (६६) असे या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. २०१३ साली साहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून ते निवृत्त झाले. त्यांचा मुलगा योगेश पालिकेत अभियंता आहे. भार्इंदरच्या सुदामा गु्रप आॅफ बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचा बिल्डर वोरा याच्याशी रामगुडे यांची ओळख मे, २०१८ मध्ये इस्टेट एजंट दिलीप गुजरमार्फत झाली. बोरीवलीच्या क्रेस्ट रॉयल अपार्टमेंटमधील फ्लॅट पार्किंगसह १ कोटी ७० लाख रुपयांत घेण्याचे रामगुडे यांनी नक्की केले. तसेच त्यांच्या फंडातील २५ लाख रुपये आरटीजीएसने वोराच्या आयडीबीआय बँक खात्यात पाठवले. मात्र याची पावती वोराने त्यांना दिलीच नाही. रामगुडेंना तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा करणे शक्य न झाल्याने त्यांनी फ्लॅट घेण्याचे रद्द करत वोराकडे २५ लाख रुपये परत मागितले. मात्र फ्लॅट विकला गेल्यानंतरच २५ लाखांपैकी ५ लाख रुपये कापून उर्वरित रक्कम परत करेन, असे एजंट गुजरमार्फत रामगुडे यांना वोराने कळविले आणि त्यांनी या प्रकरणी बोरीवली पोलिसात लेखी तक्रार दिली. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या निर्देशानंतर बोरीवली पोलीस ठाण्यात वोरा आणि त्याच्या पार्टनरवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत विचारणा करण्यासाठी वोरा याला ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क केला तेव्हा ‘बाद मे फोन करता हू’ असे म्हणत त्याने फोन कट केला आणि बरेच फोन तसेच मेसेज केल्यानंतरही त्याने काहीच उत्तर दिले नाही. रामगुडे यांनी वोराला पैसे दिल्याचे उघड झाले असून ते नेमके कोणत्या कारणासाठी देण्यात आलेत याबाबत चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद घाग यांनी सांगितले.