लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड: भाईंदरच्या ओस्तवाल ऑर्नेट इमारतीच्या नोंदणीवेळी दाखल केलेला पालिकेचा बांधकाम मंजुरी नकाशा बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर विकासक उमरावसिंह ओस्तवाल विरुद्ध दाखल गुन्ह्यात शुक्रवारी ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला नाही.
भाईंदरच्या जेसलपार्क येथे असलेली ओस्तवाल ऑर्नेट २ हि ७ मजली अनधिकृत इमारत आहे . वास्तविक १९९६ साली पालिकेने नकाशा मंजुरी करून बांधकाम परवानगी दिली होती . परंतु विकासकाने मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम केल्याने पालिकेने त्या नंतर जोत्याचे दाखला पासून भोगवटा दाखला सदर इमारतीस दिला नाही .
विकासकाने मात्र अनधिकृत ७ मजली इमारत उभारून त्यातील गाळे , सदनिका विकून गलेलठ्ठ पैसे कमावला . अनधिकृत टॉवर असून देखील महापालिकेने तोडक कारवाई केली नाहीच उलट संरक्षण देत पुरवल्या. सदर अनधिकृत इमारतीत गाळा असलेले शिजॉय मॅथ्यू यांनी सदर अनधिकृत इमारत आणि विकासक ओस्तवाल बिल्डर विरुद्ध तक्रारी व पाठपुरावा चालवला . नोंदणी कार्यालयाने सुद्धा सदर इमारतीतील मालमत्तांची खरेदी - विक्री नोंदणी तक्रारी नंतर बंद केली.
काही दिवसांपूर्वी पालिकेने तळ आणि पहिल्या मजल्याचे काही गाळ्यांचे बांधकाम पडले. परंतु इमारतच अनधिकृत असताना व गच्चीवर भले मोठे बेकायदा बांधकाम असताना त्यावर मात्र कारवाई केलेली नाही. नंतर मात्र पालिकेने चक्क भोगवटा दाखलाच देऊन टाकला.
तर बोगस नकाशा वापरून त्याची विक्री करत लोकांची फसवणूक केल्याची मॅथ्यू यांच्या तक्रारी नंतर प्रभाग अधिकारी दामोदर संख्ये यांनी २२ एप्रिल रोजी नवघर पोलिसांना चक्क टपालाने पत्र पाठवून ओस्तवाल बिल्डर ने बनावट बांधकाम मंजुरी नकाशा बनवला असल्याने पालिका व गाळेधारकांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यास विनंती केली. पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्याऐवजी चक्क टपालाने पत्र पाठवणाऱ्या प्रभाग अधिकारी दामोदर संख्ये यांची चर्चा रंगली.
दुसरीकडे गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करणाऱ्या उपनिबंधक , सहकारी संस्था यांनी देखील २००४ साली गृहनिर्माण संस्था नोंदणी साठी सादर केलेल्या कागदपत्रात बांधकाम नकाशा बनावट असल्याचे १४ मे २०२१ रोजीच्या पत्रान्वये नवघर पोलिसांना कळवून ओस्तवाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सांगितले.
अखेर पोलिसांनी २१ मे रोजी उमरावसिंह ओस्तवाल विरूद्ध विविध कलमां खाली गुन्हा दाखल केला आहे. परंतु आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. तर आरोपीने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. शुक्रवारी १८ जून रोजी त्यावर सुनावणी झाली. परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला नसल्याने आरोपीस तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी मागणी तक्रारदार मॅथ्यू यांनी केली.