भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीची शिष्यांची मागणी, आरोपी जाणार हायकोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 10:18 PM2022-02-21T22:18:03+5:302022-02-21T22:18:35+5:30
Bhayyu Maharaj Suicide Case:दुसरीकडे आरोपीचे वकील जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
इंदूर - भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर अनेक वेळा या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी भय्यू महाराजांच्या शिष्यांनी सीबीआयला पत्रही लिहिले आहे. सीबीआयने भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास करावा, अशी मागणी भक्तांकडून करण्यात आली आहे. सीबीआयने बारकाईने तपास केला तर भय्यू महाराजांनी आत्महत्या नाही तर त्यांची हत्या झाली होती हे स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांना आहे. तसेच दुसरीकडे आरोपीचे वकील जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
भय्यू महाराज यांच्या निधनानंतर उज्जैन येथील त्यांचे शिष्य भारत पोरवाल यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी सीबीआयला एक पत्रही लिहिलं. ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत. यावेळी त्यांनी इंदूर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाचाही आदर करत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, न्यायालयासमोर सर्व पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्यात आले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. पण या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द केला तर अनेक दडलेल्या बाबी स्पष्ट होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
इंदूर जिल्हा न्यायालयाने सेवादार विनायक केअरटेकर पालक आणि सेवादार शरद याला 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आरोपीचे वकील उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील आरोपी सेवादार शरद याची बाजू मांडणारे वकील धर्मेंद्र गुर्जर यांनी सांगितलं की, महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या सेवादाराने सुद्धा सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र मागणीनंतर लगेचच त्यास या प्रकरणात अटक करण्यात आली आणि आरोपी बनवण्यात आलं. आरोपी सेवेदार शरदची देखील या प्रकरणी सीबीआय तपास व्हावी अशी इच्छा आहे. त्याचबरोबर या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले आहे.
मध्यप्रदेशातील इंदूर येथील राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी रिव्हॉल्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांचे सेवेकरी विनायक दुधाडे, शरद देशमुख, पलक पुराणिक यांना केली अटक असून, ते सध्या कारागृहात आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर कुहू ही प्रसारमाध्यमांपासून दूर होती. वडिलांशी निगडित अनेक गोष्टी तिने न्यायालयाला सांगितल्या. यामध्ये संपत्तीचा वाद, भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी, परिवारातील अन्य सदस्यांचे वागणे या गोष्टींचा समावेश होता.