डॉ. खुशालचंद बाहेती
लोकमत न्यूज नेटवर्क, चेन्नई: तामिळनाडूचे माजी विशेष पोलिस महासंचालक राजेश दास यांना विल्लुपुरम येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या लैंगिक छळप्रकरणी दोषी ठरवले आहे. पीडितेला तक्रार करण्यास प्रतिबंध केल्याबद्दल न्यायालयाने पोलिस अधीक्षकांना दंडही ठोठावला.
फेब्रुवारी २०२१ मध्ये महिला आयपीएस अधिकाऱ्याचा राजेश दास यांनी उलुंदुरपेट जिल्ह्यात सोबत सरकारी दौऱ्यावर जाताना कारमध्ये लैंगिक छळ केला. याची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विशेष डीजीपी आणि चेंगलपट्टूचे एसपी डी. कन्नन यांनी तिला तक्रार नोंदवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिस महासंचालकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या आणि चेंगलपट्टूच्या एसपी विरुद्ध आयपीसीच्या विनयभंग, धमकीच्या व तामिळनाडू महिला छळ प्रतिबंध कायद्याच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला.
२०२१ मध्ये मद्रास हायकोर्टाने या घटनेची स्वत:हून दखल घेतली होती. दास यांनी हे आरोप बिनबुडाचे आहेत असा दावा केला होता. महिला आयपीएस अधिकाऱ्याला तक्रार दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या चेंगलपट्टूचे तत्कालीन एस.पी. डी. कन्नन यांनाही न्यायालयाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला.
तपास यंत्रणांवर दबाव
दास यांनी हा खटला तामिळनाडूबाहेर चालवण्याची मागणी केली होती. हायकोर्टाने खटला वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. कमीत कमी वेळेत आरोपपत्र दाखल करण्यासाठी तपास यंत्रणांवर दबाव टाकण्यात आल्याचा त्यांचा दावा होता.