जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटमध्ये आघाडीच्या तारकांचा सहभाग स्पष्ट होत असतानाच याचे कनेक्शन प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरपर्यंत पोहचले आहे. त्याच्या धर्मा प्रॉडक्शन कंपनीचा सहसंचालक क्षितिज प्रसाद अंमली पदार्थ घेत असल्याची माहिती समोर आल्याने एनसीबीने त्याला शुक्रवारी चौकशीस बोलावले आहे. तो जुहू येथील निवासस्थानी आढळून न आल्याने तेथे याबाबत नोटीस लावल्याचे तपास पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अभिनेत्री दीपिका पदुकोणसह तिची मॅनेजर करिष्मा प्रकाश, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांची शुक्रवारी चौकशी होईल. दीपिकाच्या तीन वर्षांपूर्वीच्या तिच्या मॅनेजरसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. चौकशीस हजर रहाण्यास रात्री गोव्यातून पती अभिनेता रणवीरसह ती मुंबईला परतली. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास तिला कार्यालयात हजर व्हावे लागेल. एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर अनुज केशवानी, टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या चौकशीतून सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांची नावे समोर आली. रकुलला शुक्रवारी तर सारा व श्रद्धाला शनिवारी कार्यालयात हजर रहावे लागेल. त्यासाठी साराही गुरुवारी गोव्याहून मुंबईत आली. दीपिकाची मॅनेजर करिष्मा प्रकाशलाही चौकशीस सामोरे जावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
करणच्या ‘त्या’ पार्टीचे रहस्य उलगडणारअभिनेत्री कंगना रनौतसह भाजपच्या अनेक नेत्यांच्या टार्गेटवर असलेल्या करण जोहर याच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत क्षितिज प्रसादकडे विचारणा केली जाणार आहे. शुक्रवारी चौकशीला बोलाविल्याने तो रात्री दिल्लीतून परतला. धर्मा प्रॉडक्शनचा सहसंचालक असल्याने करणच्या व्हायरल झालेल्या ‘त्या’ कथित पार्टीच्या व्हिडीओबाबत चौकशी केली जाईल. भाजपच्या एका आमदाराने यासंदर्भात केलेला तक्रार अर्ज दिल्ली एनसीबीने मागील आठवड्यात मुंबईच्या कार्यालयाकडे वर्ग केला आहे.