मुंबई - गणेशोत्सवादरम्यान दादर ते चिंचपोकळी स्थानकातील लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरी झालेल्या 20 मोबाइल जप्त करण्यात दादर रेल्वे पोलिसांना यश आले आहे. या मोबाइलची एकूण किंमत 4 लाख 75 हजार रुपये असल्याची माहिती मध्य परिमंडळाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले. 20 मोबाइलपैकी 7 मोबाइल मालकांची ओळख पटवण्यात आली आहे. उर्वरित 13 मोबाइल मालकांची ओळख पटलेली नाही. ज्या नागरिकांचे मोबाइल चोरी झालेले आहे त्यांनी दादर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी केले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोबाईल चोरी करणारी परराज्यातील टोळी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चिंचपोकळी रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढत असताना ज्ञानेश्वर जगताप यांच्या खिशातील 17 हजाराचा मोबाईल काढून पलायन करणाऱ्या दिल्लीतील हरीषकुमार अमरसिंग या चोराला लोहमार्ग पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्या एका साथीदारालाही अटक केली आहे. पोलिसांनी हरीषकुमारची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात त्याचे चार साथीदारही असल्याचे त्याने सांगितले. ते मुंबईतील दोनटाकी परिसरातील हॉटेलमध्ये लपल्याची माहितीही त्याने दिली. पोलिसांनी सापळा लावून हॉटेलमध्ये छापा टाकला असता सोनू शर्मा या त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. त्याच्या खोलीची झडती घेतली असता 4 लाख 75 हजार किंमतीचे चोरलेले मोबाईल सापडले. पोलिसांनी एकूण 21 मोबाईल जप्त केले असून त्यांची किंमत 4 लाख 92 हजार आहे.