लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील हनुमाननगर परिसरात बुधवारी मध्यरात्री १५पेक्षा जास्त जणांच्या टोळीने हातात तलवारी घेऊन धिंगाणा घातला. त्यांनी १०पेक्षा जास्त घरांची तोडफोड केली असून अनेक घरांतून चोरी केली आहे. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला असून काही जणांना ताब्यात घेतले आहे.उल्हासनगर कॅम्प नं १ येथील हनुमाननगरमध्ये बुधवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान १५पेक्षा जास्त जणांच्या टोळक्याने हातात तलवारी घेऊन धिंगाणा घातला. हा धिंगाणा सुरू असताना गस्तीवरील पोलीस तेथे आले, मात्र त्यांनी चौकशी न करता तेथून पळ काढला असे स्थानिकांचे म्हणणे आहे. टोळीच्या दहशतीमुळे कोणताही नागरिक तक्रार करण्यास पुढे आला नाही. धिंगाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून काही जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.टोळीतील काही जणांनी झा नावाच्या तरुणाला बुधवारी एका कंपनीत जाऊन मारहाण केली. गंभीर जखमी असलेल्या तरुणावर उपचार सुरू असल्याची चर्चाही परिसरात आहे. पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त टी. बी. टेळे यांनी दिली. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान शहरात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सामान्यांनी विचारला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
उल्हासनगरात तलवारी घेऊन टोळीचा धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 1:47 AM