मुंबई : शाळेत टाइम बॉम्ब पेरला असल्याचा दावा करणारा दूरध्वनी मंगळवारी दुपारी वांद्रे येथील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत आला आणि सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. दूरध्वनी करणाऱ्याने लगेचच फोन कट केला. शाळा व्यवस्थापनाने तातडीने यासंदर्भात बीकेसी पोलिसांना कळवले. बॉम्बशोधक पथकाने शाळेचा संपूर्ण परिसर पिंजून काढला परंतु कुठेही बॉम्बसदृश काही आढळले नाही. दरम्यान, प्रसिद्धी मिळविण्यासाठी हा धमकीचा दूरध्वनी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरूभाई अंबानी शाळेत मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून शाळेत टाइम बॉम्ब पेरला असल्याचा दावा केला. त्यानंतर संबंधिताने फोन कट केला. पुन्हा त्याच व्यक्तीने थोड्या वेळाने शाळेच्या प्रवेशद्वारावर दूरध्वनी करून आपली ओळख विक्रमसिंह असल्याचे सांगत प्रसिद्धी मिळविण्यासाठी शाळेत टाइम बॉम्ब पेरल्याचा दूरध्वनी केल्याचा दावा केला आहे. त्याने तीन वेळा फोन करत ‘मैने आपके स्कूल मे टाइम बॉम्ब लगाया है’, असेही शाळा कर्मचाऱ्यांना सांगितले. बीकेसी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून, त्याची ओळखही पटल्याचे समजते.
म्हणे, अंबानी कुटुंबीय विचारतील...
धमकीचा फोन करणाऱ्याने पोलिस आपल्याला अटक करतील आणि त्यामुळे मीडियात प्रसिद्धी मिळेल. तसेच मुकेश व नीता अंबानी आपल्याला विचारतील, याची आपल्याला कल्पना असल्याचे सांगितले. विक्रमसिंहने त्याच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी त्याचे मतदार, आधार आणि पॅन कार्ड शाळेच्या प्रशासन विभाग कर्मचारी चंद्रिका गिरिधर यांच्या सोबत शेअर केले. ओळखपत्रावरील तपशिलांच्या आधारे, बीकेसी पोलिस ठाण्याने सिंहच्या विरोधात दखलपात्र गुन्हा नोंदवला.