नवी दिल्ली - मोबाईल हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. पण काही वेळा हा जीवघेणा देखील ठरू शकतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने मोबाईलसाठी 20 हजार न दिल्याने मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. हे प्रकरण धौलपूर जिल्ह्यातील सरमाथुरा पोलीस स्टेशन परिसरातील बिजौली गावाशी संबंधित आहे. गुरुवारी रात्री एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. हा तरुण आपल्या आईकडून 20 हजारांचा मोबाईल घेण्यासाठी हट्ट करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत यांचा 18 वर्षीय मुलगा संग्राम सिंह याने बुधवारी दुपारी 20 हजार किंमतीचा मोबाईल घेण्यासाठी आईकडे हट्ट केला, मात्र पैसे नसल्याने आईला मुलाचा हट्ट पूर्ण करता आला नाही. आईने मुलाला वडिलांकडून पैसे घेऊन देण्याचं आश्वासन दिलं. यावर तरुणाने संतापून आपलं पुस्तक आणि घरातील काही साहित्य पेटवून दिलं. मुलाचा राग पाहून आईनं आपल्याजवळचे 8 हजार रुपये मुलाला दिले. मात्र तरुण 20 हजार रुपये घेण्याच्या हट्टावर ठाम होता.
गोळी झाडून केली आत्महत्या
तरुणाने संध्याकाळी गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला जखमी अवस्थेत सरमथुरा रुग्णालयात नेले. जिथे रुग्णालयात डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. या तरुणाने गोळी झाडून आत्महत्या केली, त्यावेळी त्याचे वडील कामासाठी जयपूरला गेले होते. तरुणाला दोन भाऊ आणि एक बहीण असून ते गावातील शाळेतच शिकतात. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.