देवेंद्र पाठक, धुळे: जिल्ह्यातील १० पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील अमली पदार्थांचा अवैध साठा पोलीस मुख्यालयातील मैदानावर सोमवारी सकाळी नष्ट करण्यात आला. त्यात गांजा, अफूची बोंडे आणि गांजाची झाडे असा एकूण १ कोटी १५ लाख ३० हजार ९६६ रुपयांचा गोळा झालेल्या मुद्देमालाचा समावेश होता.
जिल्ह्यात वेगवेगळया पोलीस ठाणे येथे दाखल अमली पदार्थांचे गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल हा विविध न्यायालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर तसेच तज्ञांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर मुद्देमाल हा पोलीस मुख्यालय, धुळे येथील मध्यवर्ती साठागृहात जमा करण्यात येतो. सदर मध्यवर्ती साठागृहात जमा झालेला अमली पदार्थाचा मुद्देमाल हा पोलीस अधीक्षक यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय कमिटीची स्थापना करून सदर समिती मार्फत पर्यावरणाचा -हास होणार नाही याची दक्षता घेऊन नाश करणे बाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलिस मुख्यालयातील मैदानावर हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शहर विभागाचे उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, शिवाजी बुधवंत, हेमंत पाटील आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
३२ गुन्ह्यातील माल- धुळे जिल्हयातील वेगवेगळया दहा पोलीस ठाणे मधील एकूण ३२ गुन्हयांतील एकूण १०८५ किलो ८६५ ग्रॅम वजनाचा गांजा, ८९२ किलो २५० ग्रॅम गांजा झाडे, २३२ किलो ४३८ ग्रॅम अफु बोंडे व १० कि.ग्रॅ. गांजा लागवड बि-बियाणे असा एकूण किंमत अंदाजे रूपये १ कोटी १५ लाख ३० हजार ९६६ रुपये किंमतीचा मुद्देमाल होता.
यापुढे ही सतत अशा प्रकारच्या अमली पदार्थ विरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार असून बातमीदारचे नांव गुप्त ठेवण्यात येईल. पोलिसांशी संपर्क करा, असे संजय बारकुंड (पोलीस अधीक्षक, धुळे) म्हणाले.