धुळे : धुळे शहरातील साक्री रोडवरील जमनागिरी भिलाटीतील राहत्या घरात महिलेचा खून करणार्या संशयित आरोपीला धुळे शहर पोलिसांनी 24 तासांच्या आतच बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेतील संशयित आरोपीला शिर्डीतून ताब्यात घेण्यात आले. शहर पोलिसांच्या वेगवान कामगिरीचे पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पथकाला 5 हजारांचे बक्षीस जाहीर केले.
निता वसंत गांगुर्डे (सोहीके) असे मयत महिलेचे नाव आहे. ती बादल रामप्रसाद सोहिते याच्यासोबत लग्न करण्यासाठी मार्च 2020 पासून घरातून निघून गेली होती. बादल सोहिके व निता गांगुर्डे हे दोघे गोपाळनगर मागील जमनागिरी भिलाटीत 4 ते 5 महिन्यापासून एकत्र राहत होते. दरम्यान, बादल सोहिते हा निता हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. गेल्या 14 जानेवारी रात्री साडेदहानंतर बादल सोहिते याने निताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. यानंतर तिचा खून करुन फरार झाला.
याबाबत मयत निताचा भाऊ सचिन वसंत गांगुर्डे (वय 28 रा.रमाबाई आंबेडकर नगर, गल्ली नं.9 देवपुर धुळे) याने दिलेल्या फिर्यादीवरुन बादल सोहिते याच्याविरोधात काल सायंकाळी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हाचे गांर्भीय लक्षात घेत धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, पोना कुंदन पटाईत, पोकॉ निलेश पोतदार, पोकॉ मनिष सोनगीरे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीताला शिर्डी येथून ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सहा. पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.