लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कर्नाटकमध्ये हिरे दलाल म्हणून कार्यरत असलेल्या ख्वाजा सिद्दीकी (३५) यांना एका व्यक्तीने हिरे विकून देण्याचे आमिष दाखवित जवळपास १७ लाखांचा चुना लावला आहे. याप्रकरणी त्यांनी विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर अब्दुल मुजावर (३५) या भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सिद्दीकी यांनी विलेपार्ले पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुजावर सोबत राजू बंगाली नावाच्या झवेरी बाजारातील व्यक्तीच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात किरकोळ हिरे खरेदी विक्रीचे व्यवहारही झाले. त्यानंतर त्यांचे मोबाइलवर अधूनमधून बोलणे व्हायचे आणि मार्च २०२३ मध्ये मुजावरच्या व्हाट्सॲपवर सिद्दीकी यांनी काही हिऱ्यांचे फोटो पाठवीत त्याची विक्री त्यांना करायची असल्याचे त्याला सांगितले. सिद्दीकी २१ मार्च रोजी मुंबईला आले आणि विलेपार्ले स्टेशन येथे दुसऱ्या दिवशी मुजावरने त्यांना रामकृष्ण हॉटेल या ठिकाणी व्यवहारासाठी बोलाविले. त्यांची भेट झाल्यावर मुजावरने सिद्दीकी यांच्याकडून हिरे घेतले आणि त्यांना बाहेरच थांबवत हिरे आणि त्याचे सर्टिफिकेट हॉटेलमध्ये व्यापाराला दाखवून येतो, असे सांगून तो आत गेला. त्याची वाट पाहत सिद्दीकी आणि त्यांचे एक मित्र राजेश जैन (५१) हे बाहेर थांबले होते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही मुजावर परत आला नाही.
पुढे काय घडलं?
- सिद्दीकी यांनी त्याला मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला जो स्वीच ऑफ आढळला.- दोन दिवस त्याची वाट पाहिल्यानंतर सिद्दीकी यांचे वडील आजारी पडल्याने त्यांना कर्नाटकला परत जावे लागले.- त्यांनी १ एप्रिल रोजी जैन यांच्या सोबत विलेपार्ले पोलिस ठाणे गाठले. तिथे जाऊन मुजावरच्या विरोधात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.