नाशिक - फर्निश ऑइलचा परवाना घेत सर्रासपणे बेकायदेशीररित्या बायो डिझेलची विक्री करणाऱ्या सिन्नर औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याचे पितळ पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने उघडे पाडले. गोपनीय माहितीवरुन पथकाने सापळा रचून संशयास्पद टँकरचा पाठलाग करत रोखले असता टँकरमध्ये डिझेलसदृश्य स्फोटक द्रव्याचा सुमारे ३३ हजार ५०० लिटरचा साठा आढळून आला. पोलिसांनी ज्या कारखान्यातून टँकरचा भरणा झाला त्या ओमसाई बायो एनर्जी कंपनीवर तत्काळ सोमवारी (दि.२२) धाड टाकली.
जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटनाचे आदेश उपमहानिरिक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी दिले आहे. त्यानुसार सचिन पाटील यांनी ग्रामिण पोलिसांना आदेशित करत अवैध धंदेविरोधी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत औद्योगिक वसाहतीच्या परिसरात सापळा रचला. यावेळी एक संशयास्पद टॅकर (एमएच १५ एफव्ही ९९१०) हा कंपनीतुन बाहेर येत असल्याचे पथकाच्या नजरेस पडले. पोलीसांनी पाठलाग करून टँकरला रोखला. तपासणीमध्ये टँकर डिझेलसदृश्य स्फोटक द्रव्याने भरलेला आढळला. पोलिसांनी टँकर जप्त करत जेथून टँकर बाहेर पडला त्या ओमसाई बायो एनर्जी प्रा. लि. कंपनीवर छापा टाकला. तेथे २५ लाख ९९ हजार रुपये किंमतीचा माल टँकरमध्ये साठवणूक केल्याचे आढळले.
कंपनी मालकासह चार संशयितांविरुद्ध गुन्हायाप्रकरणी संशयित कंपनी मालक रमेश किसनराव कानडे, सुयोग रमेश कानडे, राजेंद्र बबन चव्हाण, अझर नुरमोहम्मद खान, अनिल महादु माळी यांच्याविरुद्ध अवैधरित्या जिवनावश्यक वस्तु कायद्यानुसार स्फोटक अधिनियम द्रव्य पदार्थ व सह जिवनमापे कलम अंमलबजावणी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कारखनदाराकडून शासनाची फसवणूकओम साई कंपनीचे मालक संशयित रमेश किसन कानडे यांच्याकडे डिझेलसदृश्य साठ्याच्या बाबतीत चौकशी केली असता त्यांच्याकडे फर्निश ऑइलचा परवाना असल्याचे आढळून आले. संशयितांकडून फर्निश ऑईलचे बील तयार करुन देत (बनावट बिल्टी) त्याऐवजी डिझेल सदृक्ष द्रव्याचा पुरवठा टँकरमध्ये भरुन केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. संशयितांनी शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने ग्रामीण पोलीस अधिअधिक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.