लातूर : नांदेड महामार्गावरील भातखेडा ते भातांगळी दरम्यान ऊसाचा ट्रॅक्टर, डिझेल टँकरचा अपघात झाला. या अपघातात डिझेलच्या टँकरने पेट घेतली. बाजूने जात असलेल्या एका बसलाही या अपघाताची झळ पोहचली. अचानकपणे पेट घेतलेल्या टँकरमुळे दोन्ही बाजुंनी वाहतूक कोंडी झाली. हा अपघात बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर ते नांदेड महामार्गावर भातखेडा ते भातांगळी दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे एकेरी बाजुने वाहतूक आहे. लातूरहून नांदेडच्या दिशेने जाणारा टँकर भातांगळी नजीक आला. दरम्यान ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टरही याच मार्गावरून जात होता. यावेळी टँकर आणि ट्रॅक्टरचे घर्षण झाले. यामुळे डिझेलच्या टँकरने अचानक पेट घेतली. याचवेळी बाजूने जात असलेल्या एका बसलाही अपघाताचा फटका बसला. काही क्षणात डिझेलच्या टँकरचा भडका उडाला, ही माहिती लातूर ग्रामीण पोलिसांना मिळाली. तातडीने आग्नीशामन दल व लातूर ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री ११.३० वाजेपर्यंत आग विझविण्यासाठी आग्नीशामन जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेत नेमके किती नुकसान झाले आहे, हे समजू शकले नाही.
अपघाताचे कारण अस्पष्ट...
घटनास्थळी पोलिसांचे पथक, अग्नीशामन दलाचे जवान तातडीने दाखल झाले आहे. ते आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नेमक्या किती वाहनांनी पेट घेतला. किती नुकसान झाले, हे आग आटोक्यात आल्यानंतर समोर येणार आहे. यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर टँकरने पेटला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली.