महाड : महाड तालुक्यातील नेराव येथील विवाहितेने केलेल्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. गावातीलच एका व्यक्तीने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२४ सप्टेंबरच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास मुक्ता शिवानंद सुतार (३५) या महिलेने गावातील तलावात उडी मारून आत्महत्या केली होती. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा भाऊ ज्ञानदेव सोपान सुतार (वय २८) याचाही तलावात बुडून मृत्यू झाला होता. प्रारंभी सासूबरोबर झालेल्या वादातून तिने आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली होती. मात्र तपासात वेगळीच माहिती पुढे आली.२४ सप्टेबरच्या पहाटे मुक्ता सुतार आपल्या स्वयंपाकघरात काम करीत असताना याच गावातील विठ्ठल सुदाम चिखलेकर हा व्यक्ती घरात घुसला आणि त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तो गोंधळ ऐकून तिची सासू सुशिला सुतार (७१) तेथे आली आणि तिने आरडाओरडा केला. त्यानंतर विठ्ठलने आपल्या हातातील वस्तूने सुशिला यांच्या डोक्यात फटका मारुन पोबारा केला.मात्र या घटनेने खजिल होऊन मुक्ता सुतार हिने गावातील तलावात उडी मारून आत्महत्या केली. चौकशीत ही बाब पुढे आल्यानंतर सुशिला सुतार यांच्या तक्रारीवरून विठ्ठल चिखलेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 2:39 AM