रेल्वे भर्ती बोर्डाच्या (RRB) एनटीपीसी परीक्षेच्या निकालाबाबाद विद्यार्थ्यांच्या निदर्शनांसंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर, भूमिगत झालेल्या खान सरांसह सहा शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्व शिक्षकांनी पोलीस ठाण्यात येऊन नोटीस न घेतल्यास त्यांच्या घरी नोटिसा चिकटवल्या जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच, कोचिंगच्या संचालकांसोबत झालेल्या बैठकीत पटनाचे एसएसपी डॉ. मानवजीत सिंह ढिल्लन यांनी म्हटले होते, की आरोपी कोचिंग संचालकांना आपली बाजू मांडण्याची संपूर्ण संधी दिली जाईल.
गुन्हा दाखल झाल्यापासून आतापर्यंत सहा शिक्षकांनी पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आयपीसीच्या ज्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे त्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे. याप्रकरणी घटनास्थळावरून अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्याच्या जबाबावरून ज्यांना आरोपी करण्यात आले आहे त्यांना चौकशीनंतरच अटक केली जाईल. पाटणाच्या पत्रकारनगर पोलीस ठाण्याने खान सरांसह सहा शिक्षकांना सीआरपीसीच्या कलम 41 अंतर्गत नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
एफआयआरनुसार, खान सर आणि इतर शिक्षकांवर उमेदवारांना भडकावल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जबाबानंतर, शिक्षकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र नगर टर्मिनलची तोडफोड केल्याप्रकरणी बिहारमधील लखीसराय भागातील तीन आणि झारखंडमधील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. संबंधित घटनेपासूनच खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटला कुलूप लागले आहे. सर्व शिक्षक भूमिगत (फरार) झाल्याचे बोलले जात आहे.
या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल - खान सर अर्थात फैजल खान, एसके झा, नवीन, अमरनाथ, गगन प्रताप आणि गोपाल वर्मा, या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.