पूनम अपराज / वैभव गायकर
नवी मुंबई - डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केलेली अल्पवयीन बेपत्ता मुलगी अखेर सापडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देहराडूनमधून या पीडित मुलीला पोलिसांनी मुंबईत आणलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एका 20 वर्षीय मित्रासोबत मुलीला मुंबईत आणल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईवरून तब्बल १७०० किमी दूर या तरुणीचा शोध लागला आहे. ६ जानेवारीला पीडित मुलगी घरातून रात्री साडे अकरा वाजता बेपत्ता झाली होती. पीडित मुलगी मुंबईस्थित लोकमान्य टिळक टर्मिनसहून उत्तरप्रदेशला गेली होती. लोकमान्य टिळक टर्मिनसवरील सीसीटीव्हीमध्ये तरुणी कैद झाली होती.तेव्हापासून पोलिसांनी या तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशात देखील नवी मुंबई पोलिसांची दोन पथकं तरुणीचा शोध घेत होत्या. अखेर तरुणी पोलिसांच्या हाती लागली आहे. कौटुंबिक मित्र देखील यावेळी तरुणीच्या सोबत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र अद्याप मुलीबाबत आम्हाला काही माहित नसल्याचे सांगितले. नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी बेपत्ता मुलगी सापडली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नवी मुंबई पोलीस तिला घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बेपत्ता तरुणी कुठे सापडली याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली जाईल असे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी स्पष्ट केले.
डीआयजी मोरे प्रकरणातील तरुणी बेपत्ता; पोलिसांकडून शोधाशोध सुरु
आता या प्रकरणाला अजून वेगळं वळणं लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वाहन चालक असलेल्या साळवेकडून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टात धमकवण्यात आल्याचा दावा तिच्या पालकांनी केला होती. पालकांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर निशिकांत मोरे यांच्या निलंबनानंतर वाहन चालकावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
गृह विभागाचा मोठा निर्णय; विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजीचे निलंबन
पनवेल सत्र न्यायालयाने मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी डीआयजी मोरेंचे प्रयत्न सुरु आहेत. डीआयजी मोरे अद्याप फरार आहेत.