मेरठ : उत्तर प्रदेशातील बागपत शहरातील दिगंबर जैन महाविद्यालयातील माता श्रुती देवी (जिनवाणी) यांची प्रतिमा विवादित असल्याचे सांगत अ. भा. विद्यार्थी परिषदेने महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर टाळेबंदी केल्यानंतर जैन समाजातील लोकांनी गुरुवारी मोर्चा काढत निषेध केला. जैन समुदायाने महाविद्यालय व्यवस्थापन समितीला याबाबत निवेदन दिले देत अभाविपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली. अभाविपचे कार्यकर्ते ही प्रतिमा हटवून तिथे सरस्वतीची प्रतिमा स्थापन करण्याची मागणी करत होते. महाविद्यालयात तोडफोडीचा प्रयत्न, विद्यार्थ्यांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी प्राचार्य डॉ. वीरेंद्र सिंह यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, ही प्रतिमा २०१६ मध्ये महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षात स्थापन करण्यात आली होती.
ट्विटरवर मागितली माफीअभाविपने ट्विटरवरून दिगंबर जैन समाजाची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिगंबर जैन शिक्षण संस्था, बागपत येथे प्रतिमेबाबत झालेल्या आंदोलनासाठी अभाविप दिगंबर जैन समाजाची माफी मागत आहे. तसेच, हेही स्पष्ट करू इच्छितोत की, ही घटना अज्ञानातून व प्रमुख कार्यकर्त्यांना माहिती नसताना झाली. अभाविप या घटनेचे अजिबात समर्थन करत नाही.