गुजरातच्या अहमदाबादमधील नारणपुरा येथे राहणाऱ्या एका महिलेला डिजिटल अरेस्ट करून तिची तब्बल ४.९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नारणपुरा पोलिसांनी गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, ओडिशा या राज्यांसह एकूण १२ आरोपींना अटक केली आहे. डिजिटल अरेस्टची ही घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली.
डिजिटल अरेस्टच्या या प्रकरणात १३ ऑक्टोबर रोजी महिलेच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हॉईस कॉल करण्यात आला आणि तिच्याकडून थायलंडला एक पार्सल पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं, ज्यावर तिचा मोबाईल क्रमांक लिहिला आहे. पार्सलमध्ये ड्रग्जसह काही बेकायदेशीर गोष्टी सापडल्या आहेत.
यानंतर महिलेला सीबीआय अधिकाऱ्याची ओळख देऊन धमकावण्यात आलं. वेगवेगळ्या सरकारी एजन्सींची कागदपत्रं दाखवून त्यांच्या पीडीएफ प्रती पाठवून दिवसभर व्हॉट्सॲप कॉल करून महिलेच्या खात्यातून वेगवेगळ्या खात्यांमध्ये ४,९२,९०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले.
फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला डिजिटल अरेस्ट केली आणि खात्यातून पडताळणीसाठी पैसे ट्रान्सफर केले जात आहेत, जे नंतर परत केले जातील असे सांगितले. परंतु दोन दिवसांनंतर फसवणूक करणाऱ्यांनी तिच्याशी संपर्क करणं बंद केलं. तेव्हा डिजिटल अरेस्ट आपली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं.
त्यानंतर लगेचच १५ ऑक्टोबर रोजी नारणपुरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. एसीपी एचएम कणसागरा म्हणाले की, 'पोलिसांनी डेटा एनालिसिस, टेक्निकल सर्विलान्स आणि ह्यूमन इंटेलिजेन्सच्या माध्यामातून तपास सुरू केला आणि मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आली.'
ते म्हणाले, 'अटक करण्यात आलेले सर्व १२ आरोपी गुजरात, राजस्थान, ओडिशा आणि तामिळनाडू येथील आहेत. हे सर्व चायनीज हँडलर्सच्या हाताखाली काम करत होते. आरोपींकडून दोन लॅपटॉप, १७ मोबाईल फोन, ११ चेकबुक, ८ डेबिट कार्ड, एक पॅन कार्ड, चार स्टँप, चार आधार कार्डच्या झेरॉक्स जप्त करण्यात आल्या आहेत.