नाशिक : 'तुम्ही बेहिशेबी मालमत्ता जमविली असून तुमच्या चार ते पाच फाईल आम्हाला प्राप्त झाल्या आहेत, मी 'ईडी' (सक्त वसुली संचालनालय) आयुक्त बोलतोय..' असा निनावी फोन एका अज्ञाताने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक दिलीप थेटे यांना करत हे प्रकरण मिटवायचे असेल तर सांगितलेली रक्कम द्या असे सांगून खंडणी वसुलीचा प्रयत्न केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.8) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या नेत्यांवरील धडक कारवाईमुळे सध्या राज्यात 'ईडी' अर्थात सक्तवसुली संचालनालय ही भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था चर्चेत आहे. 'ईडी'च्या नावाने भल्याभल्यांना घाम फुटतो. याचाच गैरफायदा घेत एका अज्ञात इसमाने या संस्थेचा आयुक्त असल्याचे भासवत कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्येष्ठ संचालक दिलीप थेटे यांना धमकावण्याचा प्रकार शुक्रवारी केला. 'इडी'चा हा तोतया अधिकारी असल्याचे त्याच्या संभाषणावरून लक्षात आल्यानंतर शनिवारी थेटे यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या अज्ञात व्यक्तीने थेटे यांना व्यवहारराच्या अनुषंगाने चार फाईल आलेल्या असुन आता काही वेळातच आर्थिक गुन्हे शाखेकडुन तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. हा गुन्हा जर दाखल होऊ द्यायचा नसेल तर काही देवाणघेवाण करुन हे प्रकरण येथेच थांबवता येईल असे सांगितल्याचे थेटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.