ठाणे - मुंबईसह ठाण्यात इलेक्ट्रीक डिस्टीब्युटरची फसवणूक करणाऱ्या पुरनचंद भवरलाल जैन (50 रा.बोरिवली) आणि भुमाराम नैनाजी कुन्हार (45 रा. दहिसर) या सराईत दुकलीला ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ठाणो शहर पोलिसांनीअटक केली. तसेच त्यांच्याकडून मुंबईतील अकरा आणि ठाण्यातील एक असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहेत. तसेच त्यांना 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती शनिवारी ठाणो गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फिलीप्स कंपनीचे 55 हजारांचे एल.ई,डी.बल्ब असा इलेक्ट्रीक वस्तूच्या फसवणूकप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी चितळसर पोलीस आणि वागळे इस्टेट गुन्हे शाखा युनीट 5 समांतर तपास करत होती. दरम्यान, वागळे इस्टेट गुन्हे शाखेने पुरनचंद आणि भुमाराम या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून त्या गुन्ह्यातील 41 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुरनचंद याच्यावर मुंबईतील अंधेरी, बोरीवली, दहिसर या पोलीस ठाण्यात 11 गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. तर भुमाराम याच्याही दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई वागळे इस्टेट युनीटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, सहायक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेनवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबु चव्हाण,दिलीप तडवी, पोलीस हवालदार देवीदास जाधव, विजयकुमार गोऱ्हे, शशिकांत नागपुरे, मनोज पवार, दिलीप शिंदे, शिवाजी रायसिंग, पोलीस नाईक राजेश क्षत्रिय,रुपवंतराव शिंदे अजित शिंदे,पोलीस शिपाई सागर सुरळकर, निर्मला शेळके या पथकाने केली.
अशी आहे त्यांच्या कामाची पद्धत
ते दोघे बोगस कागदपत्रंच्या सहाय्याने नवीन वेगवगेळे नंबरचे सिमकार्ड तसेच नवीन हॅन्डसेट घेत. त्याद्वारे जस्ट डायल या साईटवरून रिटेलर/ डिस्टीब्युटरचा नंबर मिळवत. त्यानंतर डिस्टीब्युटरशी संपर्क साधून इलेक्ट्रीक वस्तू एखाद्या अनोळखी दुकानात डिलेव्हरी करण्यास सांगत व तेथेच डिस्टीब्युटरला रक्कम अदा करून असे सांगत. त्यानंतर ते अनोळखी दुकानदाराचा नंबरवर मारवाडी किंवा गुजराती भाषेत बोलून थोडा वेळ दुकानाच्या बाहेर माल राहु द्या असे सांगत. दरम्यान, डिस्टीब्युटरला माल दुकान बाहेर सोडण्यास सांगून पैसे घेण्यासाठी दुसरीकडे बोलू फसवणूक करत होते.