नवी दिल्ली : सरकारी तसेच खासगी जाहिरात संस्थांनी अधिकाधिक मूल्याच्या जाहिराती द्याव्यात, यासाठी आपल्या दैनिकाच्या खपाची खोटी आकडेवारी सादर करणाऱ्या एका माध्यमगृहाच्या संचालकाला शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. पीव्हीएस शर्मा, असे या संचालकाचे नाव असून, त्यास २ डिसेंबरपर्यंत ईडीच्या कस्टडीत ठेवण्याचे आदेश अहमदाबाद येथील सत्र न्यायालयाने दिले आहेत.
‘सत्यम टाइम्स’ या गुजराती आणि इंग्रजीतून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकाच्या अनुक्रमे २३ हजार ५०० आणि ६ हजार ३०० प्रती रोज छापल्या जातात, असे भासवत शर्मा याने अनेक खासगी जाहिरात संस्था, तसेच केंद्रीय संस्था यांच्याकडे जाहिरातींसाठी प्रयत्न केले होते. यासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार करण्यात आली.
गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही मुंबईपासून नागपूरपर्यंत अनेक दैनिके आहेत. ज्यांनी आरएनआयकडून वाढीव वितरणाचे प्रमाणपत्र घेतले असल्याची शक्यता आहे. अशा दैनिकांना चुकीची प्रमाणपत्रे देणाऱ्या लेखापालांवरही कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
माहिती व प्रसारण खात्याकडे अनेक तक्रारी दाखल
- जाहिराती मिळविण्यासाठी खपाचे खोटे आकडे प्रसिद्ध करणाऱ्या देशभरातील दैनिकांविषयी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
- ‘रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स ऑफ इंडिया’ (आरएनआय) या संस्थेतर्फे नियुक्त लेखापालांना हाताशी धरून यातील अनेक दैनिके वितरणाची खोटी आकडेवारी असलेले प्रमाणपत्र मिळविण्यात यशस्वी ठरली आहेत.
- अशा वर्तमानपत्रांची यादी माहिती व प्रसारण मंत्रालयाने सक्तवसुली संचालनालयाकडे सादर केली असून, त्यानुसार कारवाई सुरू आहे.