डोंबिवली - गुडविन ज्वेलर्सचे संचालक हे व्हिडिओद्वारे नागरिकांना आवाहन करत आहेत, त्यांनी आधी प्रत्यक्ष लोकांसमोर यावे, तसेच आधी त्यांनी ५० कोटींची खंडणी मागणाऱ्याचे नाव जाहीर करावे असे आवाहन काँग्रेस नेते संतोष केणे, प्रदेश सचिव जोजो थॉमस यांनी केले. गुरुवारी संध्याकाळी येथील मानपाडा रस्त्यावरील गुडविन ज्वेलर्सच्या बंद दुकानासमोर शेकडो ग्राहक जमले होते.
जो तो आम्हाला आमचे पैसे परत द्या अशी मागणी करत होता. त्या ग्राहकांची समजूत घालताना केणे, थॉमस यांनी सांगितले की, काँग्रेस सर्व ग्राहकांसोबत आहे. सामन्यांच्या कष्टाचा पैसा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. कोणीही एकट्याची भावना बाळगू नये असेही ते म्हणाले. जो व्हिडीओ करून आवाहन करतो त्याला पोलीस पकडू शकत नाहीत का? यात काय आणि कोणाकोणाचे गौडबंगाल आहे कळत नाही. सत्ताधारी सत्ता स्थापन करण्यात मशगुल असून सामान्य वाऱ्यावर आहे, अडचणीत सापडला आहे त्याचे काही भान नाही का असा सवाल केणे यांनी केला.त्यामुळे आगामी काळात ठाणे, वाशी, चेंबूर या सर्व ठिकाणी ग्राहक एकत्रीकरण करण्यात येणार असल्याचे थॉमस यांनी जाहीर केले. कोणीही घाबरू नका, देशभरात या बाबत आवाज उठवून सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी आमच्या समवेत ठाणे पोलीस आयुक्त, रामनगर पोलीस यांच्याकडे यावे, आपण त्यांना निवेदन देऊ. लवकरच सत्तास्थापनेचा तिढा सुटेल आणि नंतर लगेच मुख्यमंत्री, गृहमंत्री आदीचीही आपण भेट घेऊ असेही त्यांनी आश्वासन यावेळी दिले. दरम्यान काही ग्राहकांना घेऊन केणे, थॉमस हे रामनगर पोलीस ठाण्यात गेले आणि तेथे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नागरिकांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी केली. तसेच खंडणी मागणारा तो खंडणीखोर कोण आहे? राजकीय लोकप्रतिनिधी नेता आहे का? की अन्य कोणी माफिया आहे याचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावा असेही यावेळी पोलिसांना सांगण्यात आले.