रेणापूर (जि. लातूर) : शेजा-याच्या घरातील चिंचेच्या झाडामुळे आपल्या घराचे नुकसान होऊन जीवितास धोका निर्माण झाल्याने चिंचेचे झाड तोडण्यात यावे अशी मागणी करीत तालुक्यातील वाला येथील एकाने येथील तहसील कार्यालयाच्या खुल्या जागेत अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.
महेश बंडू काळे (४०, रा. वाला, ता. रेणापूर) असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणा-याचे नाव आहे. तालुक्यातील वाला येथील महेश काळे यांच्या घराजवळील शेजा-याच्या घराच्या अंगणात चिंचेचे झाड आहे. या झाडामुळे घरावरील पत्र्यावर पाला पडत असल्याने पत्रे कुजत आहेत. तसेच पाला- पाचोळ्यामुळे घरात उंदीर, घुशी होत आहेत. परिणामी, आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्याने चिंचेचे झाड तोडण्यात यावे, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा काळे यांनी निवेदनद्वारे महिनाभरापूर्वी तहसीलदारांना दिला होता.निवेदन दिल्यापासून काळे यांच्या मागावर पोलीस होते. परंतु, त्यांचा पत्ता लागत नव्हता. तो कुठेही आढळून येत नसल्याने पोनि. सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार साजीद शेख, पोलीस कर्मचारी अनंत बुधोडकर, होमगार्ड आकाश हाके व गोविंद इरळकर हे शुक्रवारी सकाळपासून तहसील परिसरात दबा धरून होते.
दरम्यान, दुपारी महेश काळे हा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आला आणि त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न करीत असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर झडप टाकून ताब्यात घेत त्यास आत्मदहनापासून रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस जमादार साजीद शेख यांच्या फिर्यादीवरून महेश काळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.