दिल्लीत कोविडच्या रुग्णाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला पोलिसांकडूनअटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या अडथळ्याशिवाय मुखर्जी नगरमधील नुलाईफ हॉस्पिटल येथून निगम बोध घाटावर मृतदेह नेण्यासाठी १४ हजार रुपयांची मागणी रुग्णवाहिका चालकाने केली होती. हा दुर्दैवी प्रकार घडल्याने एकच संतापाची लाट उसळली आहे.
कालच दिल्लीत १२ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी नाहक बळी गेला. प्रशासनाला वारंवार कळवूनही ऑक्सिजन पुरवठा उशिरा झाल्याने मेहरौली येथील बत्रा हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या १२ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. मृतांमध्ये हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरिटिस विभागाचे प्रमुख डॉ. आर. के. हिमथानी (६२) यांचाही समावेश आहे.
या रुग्णालयात ७२७ रुग्ण असून, त्यापैकी ४८ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. शनिवारी दुपारी १२ वाजता वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची पातळी कमी झाल्याचे हाॅस्पिटलच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याची दखल घेतली. त्यानंतर दीड तासाने ऑक्सिजन टँकर दाखल झाला. मात्र, तोपर्यंत या रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर दुसरा टँकर ४ वाजता रुग्णालयात पोहोचला. सुमारे एक तास २० मिनिटे रुग्णालयातील ऑक्सिजनपुरवठा खंडित झाला होता. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी ऑक्सिजनची कमतरता दाखवत झालेल्या दुर्घटनांची नोंद केली. सध्या २२० रुग्ण ऑक्सिजनवर असून, पुढील २४ तास कठीण आहेत. पुरेसा ऑक्सिजनपुरवठा न झाल्यास अधिक जीवितहानी होण्याची भीती हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. सुधांशू बनकाटा यांनी व्यक्त केली होती.