औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात पत्र्याच्या शेडमध्ये ३१ आॅगस्ट रोजी कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासह त्याचा खून करणाऱ्या खिसेकापूला गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. किरकोळ कारणावरून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली. विशेष म्हणजे कोणताही पुरावा घटनास्थळी पोलिसांना सापडला नव्हता. एवढेच नव्हे, तर मृतदेह स्त्रीचा आहे अथवा पुरुषाचा हे देखील शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांना समजले होते.
रम्या ऊर्फ रमेश दशरथ जाधव (रा. परभणी), असे आरोपीचे नाव आहे, तर पांडुरंग रामा पवार (४५, रा. परभणी), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, राजनगरातील पत्र्याच्या शेडमध्ये कुजलेल्या अवस्थेतील अज्ञात व्यक्तीचा अर्धवट नग्नावस्थेतील मृतदेह आढळला होता. मृताची ओळख पटविण्यासारखी कोणतीही वस्तू घटनास्थळी नव्हती. शवविच्छेदन अहवालानंतर तो मृतदेह पुरुषाचा असल्याचे आणि त्याचा खून झाल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. अशा परिस्थितीत मृताची ओळख पटविणे आणि खुनाचा उलगडा करण्याचे आव्हान होते. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक विजय जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जवळीलच एका दुसऱ्या शेडमध्ये दोन पुरुष आणि एक महिला कधी-कधी रात्री मुक्कामी येत होते, अशी माहिती परिसरातील नागरिकांकडून मिळाली.
खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड ते परभणीदरम्यान रेल्वेत गर्दीत रम्या उर्फ रमेश हा पाकिटमारी करतो. त्याचे सामान सांभाळण्यासाठी एक महिला आणि अंदाजे ४५ वर्षांची व्यक्ती त्याच्यासोबत असते. तो रात्री मुक्कामी राजनगर परिसरात अधूनमधून निवाऱ्यासाठी थांबत असे. पोलिसांनी रम्या ऊर्फ रमेशचे पूर्ण नाव मिळविले आणि त्याचा शोध सुरू केला. तेव्हा तो परतूर (जि.जालना) रेल्वेस्थानकावर १७ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या हाती लागला.
सामान सांभाळण्यावरून भांडण झाल्याने संपविलेरम्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी औरंगाबादेत आणले आणि त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याने पोलिसांना सांगितले की, रेल्वेत चोरलेला माल सांभाळण्यासाठी पांडुरंग आणि त्याची पत्नी सहप्रवासी म्हणून रेल्वेत असायचे. सुमारे पावणेदोन महिन्यांपूर्वी पांडुरंग एकटाच त्याच्यासोबत होता. त्यावेळी सामान सांभाळण्यावरून त्याच्यासोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात मारहाण केली. त्यानंतर पाण्यात बुडवून त्याला जिवे मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी बेवारस शेडमध्ये प्रेत टाकले.
यांनी केला तपासपोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सावंत, उपनिरीक्षक जाधव, कर्मचारी संजय धुमाळ, सुरेश काळवणे, रमेश भालेराव, समद पठाण, हिरासिंग राजपूत, भावलाल चव्हाण, संदीप बीडकर, शेख नवाब, वीरेश बने, संजीवनी शिंदे, चालक शेख बाबर आणि ज्ञानेश्वर पवार यांनी हा तपास करून आरोपीला अटक केली.