मुंबई : चोरी करण्यासाठी गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवत असतात. दिंडोशी परिसरातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यात चोराने जैन साधूचा वेश धारण करून सोन्याचे ताट पळवून नेले. याप्रकरणी पोलिसांनी भरत दोशी याला अटक केली आहे. आरोपीवर अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याचेही उघड झाले आहे.
दिंडोशी परिसरात २३ जानेवारी दोशी याने साधूच्या वेशात १६० ग्रॅम सोन्याचे ताट चोरले. याबाबत तक्रार मिळाल्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात यांच्या मार्गदर्शनाखाली १००हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्याला मालाड पश्चिम येथून अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत क्राइम पेट्रोल मालिका पाहिल्यानंतर त्याने ही योजना आखली असे पोलिसांना सांगितले. तो दिवसाला पाच मंदिरांची रेकी करायचा. त्याठिकाणी वेश बदलून जायचा आणि चांदीच्या तसेच सोन्याच्या लहान मोठ्या वस्तू चोरून त्या विकायचा. हा सगळा पैसा तो जुगार खेळण्यात उडवत असल्याचेही समजते. मात्र याप्रकरणी कधी तक्रार दाखल केली गेली नाही त्यामुळे त्याचे फावले आणि तो असे प्रकार करत राहिला. दिंडोशी पोलिसांनी सोन्याचे ताट, सोन्याचा रॉड, स्कूटर असा जवळपास साडेपाच लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.