दिशा सालीयन मृत्यू प्रकरणी वादग्रस्त वक्तव्ये केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना दिंडोशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
नितेश राणे यांचा सहभाग असलेल्या पत्रकार परिषदेत दिवंगत दिशा सालीयनबाबत वक्तव्य करीत शिवसेनेवर हल्लाबोल करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पुत्र नितेश राणे यांची मालवणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. दिशाच्या पालकांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर राणेंवर दखलपात्र गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणी राणे पिता पुत्रांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली होती. आज यावर निर्णय घेण्यात आला.
नारायण राणे व नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून पंधरा हजार रुपयांचा हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. मुंबई पोलिसांनी अशा प्रकारच्या फालतू केसेसकडे लक्ष न देता ज्या क्रिमिनल केसेस आहेत त्याकडे जास्त लक्ष द्यावे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांचे वकील तिश मानेशिंदे यांनी दिली आहे.
तर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयच्या निर्णयाची प्रत प्राप्त झाली नाही. यामुळे आम्ही काही बोलणार नाही. प्रत प्राप्त झाल्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण...दिशाची आई वसंती सालियन (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल - मे २०२० दरम्यान दोन डील्स रद्द होऊन झालेल्या तोट्यामुळे दिशा निराश होती. तसेच तिला वेळोवेळी याबाबत समजावले होते. त्यानंतर जाहिरातीच्या शूटिंगच्या कामानिमित्त ४ जून रोजी मित्र रोहनसोबत त्याच्या मालाड येथील निवासस्थानी गेले. तेथेच, ८ जून रोजी मित्र इंद्रनीलचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच रात्री दिशासोबत बोलणे झाले होते. त्यादरम्यान, ती तणावात असल्याने तिला समजावले. पण मध्यरात्री तिने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. यादरम्यान मालवणी पोलिसांनी तपास केला. तसेच, आमचा कुणावरही संशय नसल्याचेही आम्ही सांगितले. तरी देखील १९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, दिशावर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली, असे वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या विधानाला नितेश राणे यांनी दुजोरा देऊन समाज माध्यमांवर दिशाची प्रतिष्ठा व चारित्र्य हनन करणारी आहे. खोट्या व घाणेरड्या वक्तव्यामुळे मुलीची बदनामी होत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, मालवणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.मालवणी पोलिसांनी कलम २११, ५००,५०४, ५०६ (२), ३४ सह ६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.