मुंबई : अभिनेता सुशांतसिंह याच्यासह अनेक सेलिब्रिटींची मॅनेजर असलेल्या दिशा सॅलियनचा मृत्यू हा घातपात नसून निव्वळ अपघात असल्याचा निष्कर्ष केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात केलेल्या तपासणीअंती काढला आहे. अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूच्या पाच दिवस अगोदर दिशाचा मृतदेह तिच्या इमारतीखाली आढळल्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, दिशाचा मृत्यू हा अपघात असल्याचे स्पष्ट करत सीबीआयने याला पूर्णविराम दिला आहे.
८ जूनच्या २०२०च्या मध्यरात्री दिशा आपल्या मालाड येथील घरी होती. तिच्या घरी त्या दिवशी पार्टी होती. त्यात तिने मद्यप्राशन केले होते. रात्री तिच्या १४ व्या मजल्यावर असलेल्या घराच्या पॅराफिट वॉलवरून पाय घसरून ती खाली पडली. नशेतच तिचा तोल गेला आणि ती पडली व तिचा मृत्यू झाल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. सेलिब्रिटी मॅनेजमेंटच्या व्यवसायात असलेल्या दिशाने अनेक सेलिब्रिटींची कामे सांभाळली होती. सुशांतसिंहचेही काम तिने सांभाळले होते. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या पाचच दिवसांत सुशांतचा मृत्यू झाल्यामुळे या दोन मृत्यूंमध्ये काहीतरी कनेक्शन असल्याचा आरोप झाला होता.
काहीही आक्षेपार्ह नाही दिशाच्या मृत्यूप्रकरणी तपास करताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांना काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. तिच्या व सुशांत याच्या मृत्यूमध्येदेखील कोणतेही कनेक्शन असल्याचे तपास अधिकाऱ्यांना आढळले नाही.