नांदापूर, (हिंगोली) : फुटकळ चोरी करायला आला आणि अख्ख्या आरोग्य उपकेंद्रात जागा मिळेल त्या ठिकाणी अश्लिल मजकूर लिहिल्याचा प्रकार कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे आरोग्य उपकेंद्रात घडला. यामुळे महिला कर्मचाऱ्यांत असुरक्षिततेची भावना असून कळमनुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
नांदापूर हे जि.प. सर्कलचे गाव. हिंगोलीपासून १५ ते २0 किमी अंतरावर आहे. पाच ते सहा हजार लोकसंख्या. या गावासाठी आरोग्य उपकेंद्र आहे. राजकीयदृष्ट्या प्रबळ असल्याने या उपकेंद्रात एक औषधनिर्माता, दोन परिचारिका अन् दोन सेविका आहेत. एक प्रतिनिुयक्तीवर इतरत्र आहे. शाळा व अंगणवाडीनजीकच दोन-तीन खोल्यांत या उपकेंद्राचा कारभार चालतो. येथून काही ग्रामस्थ पाणी नेत असल्याने मुख्य प्रवेशद्वार कुलूपबंद न करताच रात्री उपकेंद्र बंद करून कर्मचारी जातात. मुख्यालयी निवासाची व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांची ये-जा असते. यामुळे या उपकेंद्रात यापूर्वीही एक-दोनदा किरकोळ चोरी झाली.
जागा दिसेल तिथे लिहिले गुरुवारी रात्रीही असाच प्रकार घडला. प्रतिरुग्ण २ रुपये याप्रमाणे जमा होणारे ओपीडीचे ४00 ते ५00 रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. मात्र ही चोरी केल्यानंतर चोरट्यांनी आणखी एक उपद्व्याप करून ठेवला आहे. या ठिकाणी खिडक्या, दरवाजे, भिंती, टेबल एवढेच काय खुर्चीसह मिळेल त्या ठिकाणी अश्लिल मजकूर लिहिला. आरोग्य विभागाच्या स्लोगनवरूनही असा मजकूर तयार केला. यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना हा प्रकार कर्मचाऱ्यांवरील रागातून, खोडसाळपणाने की आणखी कोणत्या कारणातून करण्यात आला, हे कळायला मार्ग नाही. मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर गावातील प्रतिष्ठितांनाही बोलावले होते. याशिवाय कळमनुरी पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर पोलिसांनीही येथे पाहणी केली. घटनेच्या ठिकाणी चित्रीकरण केले याबाबत लवकरच आरोपीचा छडा लावला, जाईल असेही सांगण्यात आले.