२४ लाखाच्या फीवरून वकिलांमध्ये वाद; उच्च न्यायालयातील दाव्यात सहा कोटींचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:10 PM2021-07-21T16:10:53+5:302021-07-21T16:12:02+5:30
Crime News : हे प्रकरण थेट दिग्रस पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.
यवतमाळ : शासनाच्या अपिलविरोधात उच्च न्यायालयात खटला चालविण्यात आला. या खटल्यात व्याजासह सहा कोटी रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने केला. हे प्रकरण चालविणाऱ्या वकिलाला २४ लाख रुपये फी देण्याचे ठरले. या फी वरूनच दोन वकिलांमध्ये वाद झाला. हे प्रकरण थेट दिग्रस पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.
ॲड. इरफान मन्नान धोंगडे (रा. नागपूर, ह.मु. खाटीकपुरा दिग्रस) यांच्या तक्रारीवरून सलमान पठाण रफीक पठाण (२६) रा. संभाजीनगर याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी इरफान धोंगडे यांना घरात शिरुन मारहाण केली व रोख दहा हजार रुपये हिसकावून नेत धमकावले, असा आरोप आहे. तर ॲड. साजीद वर्षाणी रा. दिग्रस यांनी दिलेल्या तक्रारीवरून ॲड. इरफान धोंगडे यांच्याविरुद्ध ब्लॅकमेलिंग करणे, खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही परस्पराविरुद्ध तक्रारी करून कारवाईची मागणी केली आहे. वकिलांमध्ये फी वरून जुंपलेला वाद सध्या विधीक्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.