वैभव गायकर
पनवेल : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्त आग्रही आहेत. यासंदर्भात कृती समितीने 24 जून रोजी सिडकोला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात शेकापचा सहभाग नसला तरी आंदोलनाच्या आयोजनाच्या दृष्टीने बोलाविण्यात आलेल्या बैठकी संदर्भात शेकाप नेते राजेंद्र पाटील यांच्यावर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची परवानगी न घेता बैठक बोलवून गर्दी जमविल्याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेकाप नेते राजेंद्र पाटील हे एकमेव प्रकल्पग्रस्त नेते आहेत ज्यांनी दिबांचा पुतळा आपल्या घरी बसविला आहे.शेकापने विमानतळाच्या नामकरणा संदर्भात भुमिका बदलली तरी राजेंद्र पाटील हे दिबांच्या नावावर ठाम आहेत.आपली भूमिका आक्रमक आणि रोख ठोक पणे मांडणाऱ्या राजेंद्र पाटील यांची पनवेल ,उरण च्या राजकारणार वेगळी ओळख आहे.शेतकरी कामगार पक्षाचे नेते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांनी रविवारी उलवे सेक्टर 23 मधील जिल्हा परिषद शाळेत शेकाप कार्यकर्त्यांची बैठक बोलावून आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. एनआरआय पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या बैठकीनंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. या बैठकीची कोणतीही परवाणगी न घेतल्याने 188 कलमाप्रमाणे राजेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आला आहे.
शेकाप , महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा देणारी असली तरी स्थानिक प्रकल्पग्रस्त दिबांच्या नावावर ठाम आहेत.शेकाप नेते राजेंद्र पाटीलांच्या भूमिकेने हे स्पष्ट झाले आहे. दिबांमुळे स्थानिकांचे अस्तित्व असल्याने अशा गुन्ह्यांची मी भीती बाळगत नाही असे राजेंद्र पाटील यांनी सांगितले.