नंदुरबार : उसन्या पैशांच्या वादातून सुरत येथील व्यापाऱ्यास सुरत येथीलच तिघांनी चाकू, लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. तसेच ९० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व अंगठी जबरीने काढून घेतल्याची घटना नवापूर येथे घडली. याप्रकरणी २७ दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, सुरत येथील जमीन खरेदी-विक्रीचे व्यावसायिक भावीन पिनाकिन रावल (३७) हे सुरत येथून जळगाव येेथे त्यांच्या कारने (क्रमांक जीजे १५-सीएच २५८५) जात असताना त्यांना क्रिशी कनक फिजीवाल, रा. सुरत यांनी नवापूर येथून त्यांचा मित्रास धुळ्यापर्यंत सोबत घेऊन जाण्यास सांगितले. महामार्गावर हॉटेल ॲपेक्सजवळ कार थांबवून मित्रास बसविले. तेथे त्यांच्यात उधारीच्या पैशावरून वाद झाला. फिजिवाला याने त्यांच्या पोटाला चाकू लावून धमकावले, इतर दोघांनी लोखंडी पाईपने मारहाण केली. तेथून पुन्हा कारमध्ये डांबून पुढे महामार्गावर निर्जनस्थळी घेऊन जात चाकूने वार करून मारहाण केली. तसेच ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली. ही घटना १७ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी २७ दिवसांनी अर्थात १३ एप्रिल रोजी नवापूर पोलिसात भावीन रावल यांनी फिर्याद दिल्याने क्रीशी कनक फिजीवाला (४०) रा. सुरत व त्याचे दोन साथीदार रुतविक व अन्सूल व अजय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे करीत आहे.