म्हसवड (जि. सातारा) : वाळूच्या लिलावाच्या कारणावरून दोन सख्खे चुलत भाऊ यांच्या दोन गटांत सकाळी साडेदहा वाजता नरवणे (ता. माण) येथे झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. माणच्या तहसीलदारांनी नरवणे येथे जप्त केलेल्या वाळूचा लिलाव २२ फेब्रुवारी रोजी केला होता. पाच ब्रास वाळूचे चंद्रकांत जाधव यांनी ३३ हजार रुपये भरले होते व लिलाव घेतला होता. दरम्यान, विलास धोंडिबा जाधव यांनी तलाठ्याकडे तक्रार केली की, चंद्रकांत नाथाजी जाधव हे बेकायदा वाळू उपसा करीत आहेत. त्यावेळी चंद्रकांत जाधव यांनी वाळू लिलाव घेतल्याचे त्यांना समजले आणि त्यातूनच वाद वाढत गेला. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्यात व त्यांचे चुलत भाऊ विलास धोंडिबा जाधव यांच्या गटांमध्ये हाणामारी झाली. चाकू व कुऱ्हाडीने मारहाण झाल्याने यात अनेक जण जखमी झाले. जबर जखमी झालेले चंद्रकांत नाथाजी जाधव व विलास धोंडिबा जाधव यांना दहीवडीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर त्यांना मृत घोषित केले, असे पोलिसांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात वाळू लिलावावरून दोघांचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 8:51 AM