नाशिक : रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथील गणपती मंदिरावर दरोडा टाकून दोन सुरक्षारक्षकांच्या हत्येप्रकरणी मोक्का न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना दोन वर्षांपूर्वी पोलिसांच्या हातातून निसटून जाण्यास यशस्वी ठरलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या अखेर येवला पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून येवल्यात आठवडाभरापूर्वी झालेल्या घरफोड्यांच्या गुन्ह्यांसह अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.वयाच्या १९ वर्षांपासून गुन्हेगारीकडे वळून राज्यात संघटित गुन्हेगारीची बिजे पेरून खून, दरोडे, खुनासह दरोडे, घरफोड्या, जबरी लूट यांसारखे गंभीर स्वरूपाचे राज्यातील विविध जिल्ह्यांत २८ गुन्हे दाखल असलेला विशेष मोक्का न्यायालयाने सुनावलेल्या डझनभर आरोपींपैकी एक असलेला सतीश उर्फ सत्या जैनू काळे (२६, रा.बिलवणी, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा २०१२साली सुनावली होती. काळे हा नागपूर येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना २०१८साली एका खटल्याच्या सुनावणीसाठी त्यास निफाड सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. सुनावणी पूर्ण होताच त्यास पोलीस बंदोबस्तात रेल्वेतून नागपूरला घेऊन जात असताना भुसावळ रेल्वेस्थानकावर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन काळे हा फरार झाला होता.
दिवेआगार मंदिर दरोडा हत्याकांडातील फरार अट्टल गुन्हेगारास बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 2:12 AM