सोलापूर : भावाचे लग्नात विनापरवाना डीजे सिस्टीम लावणे महागात पडण्याचा प्रकार शहरातील बापूजी नगरात शनिवारी घडला. या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तसेच १ लाख ४० हजार रुपये किंमतीची साऊंड सिस्टीम जप्त केली आहे.
दीपक भास्कर म्हेत्रे, पैगंबर राजू शेख,शाहबाज हनिफ रंगरेजे (रा. ६६४ शुक्रवार पेठ, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस सागर गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ फेब्रुवारी रोजी यातील दीपक म्हेत्रे याच्या भावाच्या लग्न समारभाच्या निमित्ताने त्याने रात्री ८:१५ च्या सुमारास बापूजीनगरातील मोची समाज कार्यालयाजवळ घरासमोर विनापरवाना साऊंड सिस्टीम लावलेली होती.
यातील फिर्यादी असलेले पोलीस गुंड यांच्या निदर्शनास आले. शिवाय साऊंड सिस्टीमच्या मोठ्या आवाजाच्या तालावर लोकांना नाचवून उपद्रव करताना आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.