धुळे : प्रेम विवाह झालेल्या जाेडप्यात काहीतरी कारणावरून कौटुंबिक वाद सुरू होता. या वादाचे पडसाद थेट मारहाणीत झाले. डोक्यात काहीतरी हत्याराने वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
संशयित मयत महिलेचा पती नागेश दगडू कानडे (३५) याला ताब्यात घेण्यात आले. दीपाली नागेश कानडे (२८) असे मयत महिलेचे नाव आहे. साक्री रोडवरील यशवंतनगरात नागेश कानडे आणि त्याची पत्नी दीपाली यांचे वास्तव्य होते. त्यांचा गेल्या ७ ते ८ वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झालेला होता. पुढच्या आठवड्यात लहान मुलाच्या शेंडीचा धार्मिक कार्यक्रम होणार होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांच्या दोन दिवसांपासून कोणत्यातरी कारणावरुन कौटुंबिक वाद सुरु होते. हे वाद वाढत असताना नागेश याने पत्नी दीपाली हिला मारहाण केली. कोणत्यातरी वस्तूने तिच्या डोक्यात वार केल्याने ती रक्तबंबाळ झाली. यावेळेस घरात असलेले महिलेचे जेठ गणेश दगडू कानडे यांनी तिला गंभीर जखमी अवस्थेत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली; पण डोक्याला वार अधिक लागल्याने तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.
नागेश कानडे हा खासगी व्यवसाय करतो. कधी डीजे चालकाचे काम करतो तर महामार्गावरील शो-रुमवर जाऊन काम करत होता. त्यांना एक अपत्य आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. घटनास्थळी शहर पोलिस निरीक्षक आनंद कोकरे आणि पोलिसांच्या पथकाने धाव घेतली. ज्या ठिकाणी घटना घडली त्या भागात कोणालाही जाऊ दिले जात नव्हते. दोन मजली असलेल्या इमारतीच्या पायऱ्यावर रक्ताचे थेंब पडलेले होते. घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. संशयित नागेश कानडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला आहे की अजून काही वेगळे कारण याचा शोध पोलिस घेत आहेत.