मुंबई: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अंधेरीत कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार मंगेश राजणे (३८) हे अंमलदार डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ मे रोजी रात्री उशीरा गिल्बर्ट हिल रोड परिसरात एक व्यक्ती कोयता घेऊन आसपासच्या लोकांमध्ये दहशत पसरवत असल्याची माहिती डी एन नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे 'आज एक एक को मार डालूंगा किसी को नही छोडूंगा असे म्हणत हातामध्ये धारदार कोयता घेऊन पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणारा इसम त्यांनी पाहिला. त्याला पाहून रस्त्याने लोक सैरावैरा पळू लागले तसेच आजूबाजूचे दुकानदार घाबरून त्यांच्या दुकानाची शटर्स बंद करू लागले.
परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी डी एन नगर पोलिसांनी सदर व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतले. ज्याचे नाव फरदीन शेख उर्फ मोगली (२३) असे असल्याचे चौकशीत समजले. त्याच्याकडे असलेला कोयताही हस्तगत करण्यात आला असून त्याच्या विरोधात संबंधित कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.