मुंबई - देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून देशातील गुप्तचर यंत्रणा सक्रिय झालेली आहे. त्यातच काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वेगवेगळे डाव आखू शकतात. सध्या देशात आयपीएलचा मौसम सुरु असून आयपीएलदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि परदेशी क्रिकेटर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, मुंबई पोलिसांनी याबाबतचे पसरलेले वृत्त खोटे असून मुंबईत अशा प्रकारे कोणताही अलर्ट नसल्याचा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी या वृत्तावर खुलासा करत लोकमतशी बोलताना समाजात भीती निर्माण करण्यासाठी अशी माहिती पसरवली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क जरूर राहावे मात्र, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवू नये असे आवाहन केले आहे.
आयपीएलदरम्यान परदेशी क्रिकेटर्सच्या बसवर दहशतवादी गोळीबार करू शकतात. तसेच वानखेडे स्टेडियम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी परदेशी क्रिकेटर्स ज्या हॉटेलमध्ये राहतील तेथील आणि वानखेडे स्टेडियम येथे सुरक्षा वाढविण्यात आली असून मुंबईत अलर्ट असल्याचे वृत्त पसरले होते. मात्र हे वृत्त खोटे असून मुंबईत असा कोणताही अलर्ट नसल्याचं पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून किंवा घाबरून न जात सतर्क राहा असं आवाहन त्यांनी केलं आहे.