लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एखाद्याचा मोबाइल चोरी झाला असल्यास चोरीची तक्रार घ्या. त्याला हरवल्याबाबत दाखवून चुकीचे पोलिसिंग करू नका, अन्यथा कारवाई करू असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केला आहे. तसेच, दर रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे ते नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे.
आयुक्तांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा केली. यादरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर विशेष भर देताना दिसले. ‘बीट अधिकाऱ्याने त्याच्या बीटमधील सर्व ज्येष्ठ नागरिकांची यादी मिळवून, ती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना द्यावी. त्यापैकी बीट अधिकाऱ्याने जेष्ठ नागरिकांना नोटबुकचे वाटप करावे. बीट कॉन्स्टेबलने आठवड्यातून किमान दोनदा भेट देऊन त्या नोटबुकवर आपली स्वाक्षरी करावी. दर आठवड्याला बीट अधिकाऱ्याने भेट देऊन तपासणी करावी.
बीट पोलीस निरीक्षक दर १५ दिवसांतून एकदा पर्यवेक्षण करेल आणि अधिकारी व अंमलदार यांनी भेट दिली आहे का त्याची तपासणी करेल अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहे. तसेच, महिनाअखेरीस वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सर्व बीटच्या डायरीची तपासणी करावी, बीट अधिकारी व अंमलदार गस्ती बाबत नोंद घ्यावी. तसेच काही समस्या असल्यास आमच्या निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
दर रविवारी तीन ते साडे तीनच्या सुमारास ते जनतेशी संवाद साधणार आहे. यादरम्यान नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडीसारख्या विविध समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवाय वाहतूक कोंडीच्या समस्येला त्यांनाही तोंड द्यावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे सायबर गुन्हेगारांपासूनही नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. प्रत्येक तक्रारीची योग्यरीत्या नोंद करत दखल घ्यावी. जनतेच्या मनात, येथे तक्रार केल्यास न्याय मिळेल असा विश्वास निर्माण होईल असे कार्य करा, असेही ते म्हणाले.